नवापुर (प्रतिनिधी) – तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेसला पूर्णकालीन जिल्हाध्यक्ष मिळणार असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर राखत लोकशाही पद्धतीने सर्वमान्य व सक्षम नेतृत्वाची निवड केली जाईल, असे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या ‘संघटन सुदृढीकरण अभियान’ अंतर्गत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीसाठी नवापूर येथील सिनियर कॉलेज कै. प्रताप केशव पाटील सभागृहात बैठक पार पडली.
यावेळी प्रभारी अनिल पाटील, जावेद फारुकी, आमदार शिरीषकुमार नाईक, खासदार ॲड. गोवाल पाडवी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अखिलेश शुक्ला पुढील सात दिवस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून कार्यकर्त्यांचे अभिप्राय जाणून घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर सर्वानुमते जिल्हाध्यक्षाची निवड केली जाणार आहे.
आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याचे सांगत, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख अधोरेखित केली.
नव्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीमुळे संघटन बांधणीला वेग येणार असून, त्यानंतर तालुका व विभागीय स्तरावरही नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटन विस्तारावर भर दिला जाणार आहे.




