प्रा.डॉ.निलेश उत्तम गायकवाड यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
महात्मा फुले एम.एस.डब्ल्यू. व मातोश्री झवेरीबेन मोतीलाल तुरखिया बी.एस.डब्ल्यू. महाविद्यालय, तळोदा (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. निलेश उत्तम गायकवाड (एम.एस.डब्ल्यू., SET, Ph.D.) यांची दिनांक 15 जून 2026 पासून प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2010 पासून ते महाविद्यालयात कार्यरत असून त्यांना सुमारे 16 वर्षांचा शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लाभला आहे.

प्रा. डॉ. गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर एकूण 25 संशोधन निबंधांचे सादरीकरण व प्रकाशन केले आहे. आदिवासी शिक्षण, महिला सक्षमीकरण, मानवाधिकार, भारतीय संविधान, पंचायतराज व्यवस्था, समुदाय विकास आदी विविध सामाजिक विषयांवर त्यांनी संशोधन कार्य केले आहे.
त्यांनी आतापर्यंत ‘ग्रामीण शिबीर अभ्यास’, ‘Introduction to Field Work Practice’, ‘Social Work Theories and Perspective’ तसेच ‘Social Work Perspective and Development’ ही चार पुस्तके प्रकाशित केली आहेत.
महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून युवकांची ग्रामीण विकासातील भूमिका, सायबर गुन्हे व युवकांची जबाबदारी, महिला सक्षमीकरण, आदिवासी शिक्षण, पर्यावरण संवर्धन, शासकीय योजना व आदिवासी विकास अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन व व्याख्याने दिली आहेत.
त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पेटंट कार्यालय, नवी दिल्ली यांनी ‘Indoor Air Pollution Detection’ या संशोधन डिझाईनला 15 नोव्हेंबर 2025 रोजी मान्यता प्रदान केली आहे.

प्रा. डॉ. गायकवाड हे विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय संस्थांमध्ये पदाधिकारी, सदस्य व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन नेट-सेट असोसिएशन (नंदुरबार जिल्हा) सचिव, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे सदस्य, नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्सचे सदस्य यांसह विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना साऊ-जिजाऊ पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्याभूषण राष्ट्रीय पुरस्कार, गुरु गौरव पुरस्कार, ग्लोबल एज्युकेटर्स एक्सलन्स अवॉर्ड, समाजभूषण पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सन 2014 ते 2025 या कालावधीत त्यांनी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक म्हणून काम केले. तसेच संशोधन व विस्तार कार्य समन्वयक म्हणून 2012 ते 2026 या कालावधीत 25 विविध प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केली. विविध शासकीय, निमशासकीय, CSR व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण, मूल्यमापन, सूक्ष्म नियोजन, बेसलाइन सर्वेक्षण आदी प्रकल्पांमध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून कार्य केले आहे.
विद्यापीठ स्तरावरील विविध समित्या, स्थानिक चौकशी समित्या, नैतिकता समिती तसेच अभ्यासक्रम निर्मिती आणि बोर्ड ऑफ स्टडीजच्या उपसमितींमध्येही ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थी केंद्रित शिक्षण, सामाजिक बांधिलकी, संशोधनाभिमुख दृष्टीकोन आणि संस्थात्मक विकास यांचा समन्वय साधत प्रा. डॉ. निलेश गायकवाड हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत असून त्यांच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.




