तळोदा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲड.संजय पुराणिक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अजय परदेशी, शिरीष माळी, शहराध्यक्ष गौरव वाणी, डॉ.स्वप्निल बैसाणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजन मोरे, सुरेश इंद्रजीत, डॉ. देविदास शेंडे, हर्षल तुरखिया, नगरसेवक कपिल कर्णकार, इमरान खाटीक, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, सुधीर माळी, ॲड. संदीप पवार, विजय सोनवणे, अंबालाल साठे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. यावेळी ॲड. संजय पुराणिक यांच्या महाराष्ट्र राज्य बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. पुराणिक म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशाला दिशादर्शक असून त्यांच्या जयंतीनिमित्त समाजात वैचारिक घुसळण होणे हीच खरी आदरांजली आहे.”
डॉ. शशिकांत वाणी यांनीही बाबासाहेबांनी देश व धर्मावर केलेल्या उपकारांचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
अध्यक्षीय मनोगतात आमदार राजेश पाडवी यांनी बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करत, “त्यांच्या संविधानामुळेच मला आमदार होता आले. त्यांनी दिलेला विचार हा जीवनाला दिशा देणारा आहे,” असे सांगितले. लंडन येथील स्मारकाला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी त्या ठिकाणाहून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तसेच आगामी जुलै महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या १३५ आमदारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आपली निवड ही बाबासाहेबांच्या विचारांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नगरसेविका जयश्री महाले व हंसराज महाले यांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष केदार, मुकुंदा बोरसे, सुनील पिंपळे, अशोक गवळे, ॲड. चंद्रकांत आगळे, डॉ. किशोर सामुद्रे, मिलिंद धोदरे, सुजाता धोदरे, श्यामप्रसाद आगळे, संतोष धनगर, ज्ञानेश्वर पाटील, पुष्पा वाघ, अश्विन महिरे, अरुण आगळे, यशवंत गवळे, साक्षी पिंपळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञासूर्य फाउंडेशन, तळोदा व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने करण्यात आले.
भीम पहाट कार्यक्रमाचे आकर्षण :
प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या वतीने ‘भीम पहाट’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गीतगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तळोदा शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने ‘भीम पहाट’ हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.




