नंदुरबार

शाळा परिसरात माकडांचा हैदोस

शहरातील सार्वजनिक गुजराती व मराठी हायस्कूल परिसरात माकडांनीशिक्षक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी घडली. घटनेनंतर शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली असता, तेथे अधिकारीच उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बुधवारी सकाळी झालेल्या शिक्षक सी.एस. पाटील, विजय कदम, जुनेद खान, तसेच विद्यार्थी रुतवीज कोकणी, यहुशवा गावीत, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावीत व दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तर, जेवणाचे डबे पळविण्यासह व शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत. काही वेळा विद्यार्थ्यांच्या अंगावर माकड धावून जात आहेत. धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *