जालना

रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर

सौदी अरेबियातील रियाध येथे अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील ४१ प्रवाशांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळे एअरलाइनला माघार घ्यावी लागली आहे. ‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते. मात्र सुळे यांच्या ट्विटनंतर परिस्थिती पालटली.

रियाधहून मुंबईकडे सोमवारी (ता. ६) येणारे उड्डाण रद्द झाल्यामुळे भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील सर्व प्रवासी परदेशात अडकून पडले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सुळे यांनी थेट परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच रियाध येथील भारतीय दूतावासाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रवाशांची माहिती जाहीर केली आणि प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. यानंतर रियाधमधील भारतीय दूतावास तत्काळ सक्रिय झाला. प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे दूतावासाने स्पष्ट करत एअरलाइनशी समन्वय सुरू केल्याचे सांगितले. अखेर ‘अकासा एअर’ला प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली. सुरुवातीला एअरलाइनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. सुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे व त्यांचे बंधू सुधाकर दानवे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न सुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *