राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अत्यंत मोठे आहे. हे प्रकरण अगदी हाताच्या बाहेर असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्याला खरातबाबाला सामोरे जावे लागेल, असे मत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना व भूसंपादन प्रकरणांच्या अनुषंगाने गोगावले यांनी बैठक घेतली. बारामती पोटनिवडणुकीबाबत विचारले असता, ते म्हणाले, आम्ही महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एकच अर्ज दाखल केलेला आहे. भाजप असेल किंवा शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), सर्वांनी पवार यांचाच अर्ज भरण्याचे ठरविले होते. आता विरोधक जे काही अर्ज भरत आहेत, त्याबद्दल आम्ही काय बोलणार? जरी कुणी उभे राहिले, तरी सुनेत्रा पवार निवडून आणण्यासाठी महायुती काम करेल.


