तळोदा : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. तळोदा येथील ऐतिहासिक स्मारक चौकात रात्री अचानक लागलेल्या एका बॅनरने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असून, यामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे.
‘हो रत्नाताई, तुम्ही चुकल्या…’ अशा उपरोधिक मथळ्याखाली लावण्यात आलेल्या या फलकाद्वारे पालिकेच्या सत्ताधारी गटाला अप्रत्यक्षपणे लक्ष करण्याचा प्रयत्न शिवसेना शहर प्रमुख कडून करण्यात आला आहे
काय आहे नेमकं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी तळोदा नगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत माजी नगराध्यक्षा सौ. रत्ना सुभाष चौधरी यांनी, “माझ्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी का पाठवले नाहीत?” असा थेट जाब मुख्याधिकार्यांना विचारला. यावरून सभागृहात विद्यमान नगराध्यक्षा सौ.भाग्यश्री चौधरी आणि सौ.रत्ना चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर शहरात मोठी चर्चा सुरू झाली.
राष्ट्रवादीची पत्रकार परिषदेत ठाम भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी, नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी, उपनगराध्यक्ष शितल पाडवी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे आणि गटनेते कल्पेश चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी योगेश चौधरी यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना चौधरी आणि माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या कार्यकाळातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच, “जर कोणाला खाजगी कामासाठी पालिकेचे कर्मचारी हवे असतील, तर पालिकेत अधिकृत शुल्क भरावे लागेल. फुकटात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी कोणालाही उपलब्ध होणार नाहीत,” अशी अत्यंत ठाम आणि कडक भूमिका सत्ताधारी गटाने मांडली.
वादात शिवसेनेची एन्ट्री!
एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हा वाद रंगात आलेला असतानाच, शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी या वादात थेट उडी घेतली. त्यांनी शहराच्या मध्यवर्ती स्मारक चौकात एक मोठा फलक (बॅनर) लावला. या फलकावर ‘रत्नाताई तुम्ही चुकल्यात’ असे लिहीत, त्यांच्या नगराध्यक्षा पदाच्या कार्यकाळातील कामाची शैली आणि पालिकेच्या विविध मुद्द्यांवर उपरोधिकपणे बोट ठेवून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
जनतेतून व्यक्त होत आहे अपेक्षा…..
पालिका सभागृहातील हा अंतर्गत वाद आता रस्त्यावर आल्याने येणाऱ्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होणार हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या राजकीय वादामुळे तळोदा शहराच्या विकासकामांना खिळ बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वैयक्तिक हेवेदावे आणि पूर्वग्रहदूषित राजकारण बाजूला ठेवून, लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा आता तळोद्यातील सुजाण जनता व्यक्त करत आहे.
दरम्यान पालिकेच्या वादग्रस्त विषयावर शिवसेना पुढे आल्याने या विषयावर भाजप कुठेतरी बॅक फुटवर दिसत आहे आता भाजप या विषयावर कोणती भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कालीचरण सूर्यवंशी
तळोदा ✒️




