भंडारा

महसूल अधिकाऱ्यांना धडक देत रेतीचा ट्रक पसार

अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करीत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धडक देत ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. माहितीनुसार, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (४७) हे महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोलेवाडी येथे शासकीय कामासाठी जात होते. यावेळी पहेला–पवनी मुख्य मार्गावरील नाल्याजवळ त्यांना ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ५१७५ हा विनापरवाना सुमारे ८ ब्रास रेती वाहतूक करताना आढळून आला.

ट्रकला थांबवून कारवाई सुरू असताना ट्रक मालक चारचाकी वाहनाने घटनास्थळी आला व अधिकाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर ट्रक घटनास्थळावरून पळवून नेला. फिर्यादी यांनी पाठलाग केला असता ट्रक चालकाने मंडळ अधिकारी यांच्या कारला धडक दिली. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *