बुलढाणा

एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत

बसस्थानकात शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एसटी महामंडळाच्या कारभारावर काळा डाग फासणारी ठरली आहे. परतवाडा येथून पुण्याकडे निघालेली एम. एच. १४ एलबी २३४४ क्रमांकाची लांब पल्ल्याची एसटी बस चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी बस खामगाव बसस्थानकात थांबविली.

लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढल्यानंतर चालक व वाहक यांची संशयास्पद वागणूक, बोबडे बोलणे आणि दारूचा तीव्र वास येत असल्याने प्रवाशांनी तत्काळ जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. आमच्या जीवाची किंमत नाही का? असा सवाल करत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांकडे थेट तक्रार दाखल केली. खामगाव बसस्थानकातील उपस्थित वाहतूक नियंत्रक आणि अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली असता या बसमध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. तसेच प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे दिसून येताच नशेतील वाहक चालकांना सुरक्षित स्थळी हलविले. लांब पल्ल्याच्या प्रवासात शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. बसस्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, आश्चर्य म्हणजे तब्बल एक तास प्रवासी ताटकळत राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *