पालघर

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.

पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या तरुणांचा पाठलाग करणारे लोहमार्ग पोलिस, आरपीएफ पोलिस होते की पालघर शहर पोलिस होते? याबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेप्रकरणी आकस्मिक गुन्ह्याची नोंद पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. स्वप्निल शैलेश पलांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी या तिघांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *