भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. हवेतील प्रदूषण आणि अतिसूक्ष्म धूळ कमी करण्यासाठी, त्यावर पाण्याचे अतिशय बारीक तुषार उडवणाऱ्या मशिनरीचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र या मशीनद्वारे झाडाला पाणी देणे, पुतळे धुण्याचे काम केले जात आहे. महापालिका मालकीच्या मशीन असतानाही मशीन हाताळल्या प्रकरणी लाखोंचे बिल अदा करण्यात येत आहे.
उल्हासनगरात अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामासाठी रस्ते खोदण्यात येत आहे. तसेच एमएमआरडीए व महापालिकेच्या शेकडो निधीतून विकास कामे सुरू आहेत. या विकास कामामुळे शहरांत धुळीचे प्रमाण मोठे आहे. शहरवासियांना धुळीपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने काहीं वर्षांपूर्वी दोन मिस्ट स्प्रे मशीन व दोन रस्त्यातील धूळ साफ करणाऱ्या मशीनची कोट्यावधीच्या निधीतून खरेदी केल्या आहेत.. मात्र त्या मशीन वापरण्यासाठी तज्ज्ञ ड्रायव्हर व कर्मचारी महापालिकेकडे नसल्याचे कारण पुढे करून, चारही मशीन खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्या आहेत.


