डॉ. अमरदीप महाजन ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित.
तळोदा : राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
धुळे येथील नगावबारी परिसरातील आकाशवाणी केंद्राजवळील कांकरिया भवन येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रफुल्ल सीताराम पाटील, प्रदेश महिला अध्यक्षा प्रा. मंदाकिनी भामरे, सेवानिवृत्त उपअधीक्षक (डीवायएसपी) वासुदेव देसले, शिवव्याख्याते सचिन देवरे आदी उपस्थित होते. डॉ. अमरदीप महाजन हे अध्यापक शिक्षण मंडळ, धुळे संचलित तळोद्यातील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयात त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले उपक्रम यांची दखल घेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन, सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान या सोहळ्यात सामाजिक क्षेत्र, मानवाधिकार संरक्षण, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.




