‘डायट’ नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न; एकूण ८०९ विद्यार्थ्यांची उपस्थिती
नंदुरबार :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार येथील परीक्षा केंद्र क्र. ३४०१ वर आयोजित करण्यात आलेली ‘शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा (GCC-TBC) जुलै-२०२६’ यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. दिनांक ४ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या परीक्षेचे सर्व सत्रांमधील (बॅचेस) नियोजन अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आले होते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र संचालक तथा नोडल अधिकारी श्री. विनोद बाबासाहेब लवांडे यांच्या नेतृत्वात या परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रावर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी आयटी समन्वयक म्हणून DIET चे विषय सहायक श्री. गोविंद भिला वाडीले आणि श्री. देवेंद्रकुमार बोरसे यांच्यासह तांत्रिक सहायक श्री अनिल माळी, वरूळ व श्री मच्छिंद्र पाटील, भादवड या शिक्षकांनी चोख कामगिरी बजावली.
या शासकीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध टंकलेखन विषयांच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण ९६० विद्यार्थ्यांपैकी ८०९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर १५१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
* मराठी टंकलेखन (३० व ४० श.प्र.मि.): एकूण ३०९ विद्यार्थ्यांपैकी २१७ विद्यार्थी उपस्थित होते.
* इंग्रजी टंकलेखन (३० व ४० श.प्र.मि.): एकूण ६४९ विद्यार्थ्यांपैकी ५९० विद्यार्थी उपस्थित होते.
* इंग्रजी टंकलेखन (५० श.प्र.मि.): एकूण २ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी उपस्थित होते (१००% उपस्थिती).

परीक्षा परिषदेच्या नियमांनुसार व गोपनीयतेचा भंग होऊ न देता अत्यंत वस्तुनिष्ठ वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षा संपल्यानंतर तात्काळ सर्व संगणकांवरील (PCs) विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा बॅकअप यशस्वीरीत्या सुरक्षित करण्यात आला आहे. तसेच सर्व दिवसांच्या सर्व बॅचेसची उपस्थिती पत्रके वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार निर्धारित ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली असल्याची माहिती केंद्र संचालक श्री. विनोद लवांडे यांनी दिली.




