नंदुरबार

छायाचित्रण क्षेत्रातील भीष्माचार्य कै. रामभाऊ जगन पाटील : काळाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व

नंदुरबारच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज जपणारे छायाचित्रकार, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व… १ जुलै रोजी २७ वा स्मृतिदिन

नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला आज २८ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वीच या शहराचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवन आपल्या कॅमेऱ्यातून जपणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. रामभाऊ जगन पाटील. १ जुलै रोजी त्यांचा २७ वा स्मृतिदिन असून, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन.
सन १९३२ मध्ये, छायाचित्रणाची साधने अत्यंत मर्यादित असताना, नंदुरबारमध्ये स्वतंत्र छायाचित्र व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान रामभाऊ पाटील यांनाच जातो. त्यांच्यासाठी फोटोग्राफी हा केवळ व्यवसाय नव्हता, तर काळाच्या प्रत्येक क्षणाला इतिहासात जतन करण्याचे एक पवित्र कार्य होते. त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले असंख्य फोटो आजही अनेक कुटुंबांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहेत.
त्या काळी “पाटील फोटो” हे नाव विश्वास, गुणवत्ता आणि कलात्मकतेचे प्रतीक बनले होते. प्रत्येक छायाचित्रात त्यांचा वेगळा स्पर्श जाणवत असे. आजही त्यांच्या काढलेल्या अनेक छायाचित्रांकडे पाहताना त्या काळातील जीवन, संस्कृती आणि माणुसकी जिवंत झाल्याचा अनुभव येतो.
आदिवासी समाजातील पूजनीय गुलाम महाराज यांचे दुर्मिळ छायाचित्रही रामभाऊ पाटील यांनीच टिपले. आजही त्यांच्या स्मृतिदिनी पूजला जाणारा तो फोटो अनेक आदिवासी बांधवांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक छायाचित्राची प्रत त्यांचे नातू व वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन पाटील यांच्याकडे जतन करण्यात आली आहे.
छायाचित्रणासोबतच रामभाऊ पाटील यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि शहराच्या विकासासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात पालिकेच्या इमारतींचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. शिकारीचा छंद जोपासताना त्यांनी ब्रिटिश काळात शस्त्र परवाना मिळवला, शस्त्र विक्री व्यवसाय सुरू केला आणि गॅसवर चालणारी ट्रक आणून त्या काळातही आधुनिक विचारांची ओळख करून दिली.
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी आपल्या धाकट्या भावाचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सिव्हिल इंजिनिअर बनविले. त्यांचे लहान बंधू कैलासवासी वामन जगन पाटील दिल्ली येथे स्थायिक होते. त्यांच्या परिवार आजही दिल्ली येथे वास्तव्यास आहे.
व्यक्तिमत्त्वात कर्तृत्व, दूरदृष्टी, समाजसेवा आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम होता.
१ जुलै १९९९ रोजी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले क्षण, समाजासाठी केलेले कार्य आणि नंदुरबारच्या इतिहासात उमटवलेला ठसा आजही अजरामर आहे.
त्यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त या महान छायाचित्रकाराला विनम्र अभिवादन.

“माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांनी जपलेल्या आठवणी कधीच मरत नाहीत. कै. रामभाऊ जगन पाटील यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले क्षण आजही नंदुरबारच्या इतिहासाला उजाळा देत आहेत.”

– संकलन : अविनाश पाटील, नंदुरबार
मो. ९५०३३३४६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *