शालेय शिक्षण विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व सातवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजन करण्यात येत आहे. या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.सदर परीक्षेची व्यवस्थित तयारी व्हावी, जिल्ह्याची शिष्यवृत्ती टक्केवारी वाढावी यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी मागील सात आठवड्यांपासून शाळा व केंद्र स्तरावर सराव घेण्यात आला.

जिल्ह्यातील सहा तालुक्यात तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रातून इयत्ता चौथी चे पाच विद्यार्थी व सातवीचे पाच विद्यार्थी निवड करून तालुकास्तरीय परीक्षा प्रविष्ट झालेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा सरावाच्या दृष्टीने तसेच आत्मविश्वास वाढीस पूरक अशी ही सराव परीक्षा सर्व तालुक्यात घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील इयत्ता चौथीचे 476 व सातवीचे 183 असे एकूण 659 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव या उपक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, डॉ. रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनातून व चंद्रकांत पवार, प्रदीप पाटील, विनोद लवांडे, सुभाष वसावे यांच्या सहकार्यातून सराव प्रश्नपत्रिका निर्मिती जिल्हास्तरावरून तयार करण्यात आल्या. मिशन गरुडझेप कार्यक्रमात भानुदास रोकडे,शिक्षणाधिकारी प्राथमिक, वंदना वळवी शिक्षणाधिकारी माध्यमिक , उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, डॉ.युनूस पठाण यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.
बारतालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, प्रशांत नरवडे, डॉ.योगेश सावळे, रमेश देसले, धनराज राजपूत, शेखर धनगर यांच्या सह तालुकास्तरीय टीमने नियोजनबद्ध केले. शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका निर्मितीचे कार्य प्राथमिक शिक्षक श्री अनिल सोनवणे,भूपेंद्र चौधरी विषय सहायक श्री गोविंद वाडीले यांनी केले




