योगेश मराठे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा, भाजप मध्ये प्रवेश
तळोदा शहरातील राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. शरदचंद्र पवार गटाचे तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, या बाबत लेखी स्वरूपात निरीक्षक सुनील भुसारा यांच्या कडे राजीनामा पाठविला आहे.
तळोदा शहर व तालुक्यातील राजकीय दृष्टीने मागील २० वर्षे राजकीय वाटचाल सोबत करणारे हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी आणि योगेश मराठे यांची त्रिमूर्ती आता एकाच गटाचा भाग नसून, योगेश मराठे भाजप पक्षाची वाट धरत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
योगेश मराठे यांचा राजकीय प्रवास सक्रिय आणि महत्त्वपूर्ण राहिला आहे. ते श्री गणेश सोशल ग्रुपचे जेष्ठ नगरसेवक संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय होते, आणि माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व संदीप परदेशी यांच्यासोबत त्यांचा राजकीय पल्ला वाढला. २०१९ मध्ये काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाल्यावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर, संदीप परदेशी आणि हितेंद्र क्षत्रिय यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि योगेश मराठे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा शहर प्रमुख पद मिळाले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण चेहरे, माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष संदीप परदेशी यांचे पुढील राजकीय पाऊल काय असेल, यावर राजकीय वर्तमनात मोठा चर्चेचा विषय आहे.
भाजपाशी संपर्काची चर्चा
राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर, मराठे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा तळोद्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षांतराचे शक्यता सध्या अस्पष्ट असली तरी, त्यांच्या आगामी निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की “मी राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला आहे. भविष्याचा दृष्टीने कार्यकर्त्यांच्या हिताच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय लवकरच घेईन. पक्षासाठी कार्यरत राहण्याची माझी भूमिका कायम आहे. मात्र पक्ष कुठला हे विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…
