शहरातील राजकीय अभेद त्रिमूर्ती अखेर वेगळी…… योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश
तळोदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात झाला असून मंत्री जयकुमार रावल, भाजपा महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा तळोदा मतदार संघांचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा महामंत्री बळीराम दादा पाडवी, मा नागराध्यक्ष अजय परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, शहर अध्यक्ष गौरव वाणी, महिलामोर्चा जिल्हा अध्यक्षा शानुताई वळवी, हेमलाल मगरे, प्रा विलास डामरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात त्यांनी पक्षप्रवेश केला. मराठे यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
योगेश मराठे यांचा राजकीय प्रवास अत्यंत सक्रिय आणि प्रभावी राहिला आहे. ते माजी नगराध्यक्ष भरत माळी व श्री गणेश सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. त्यानंतर, हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांच्या सोबत त्यांनी राजकीय घडामोडींमध्ये आपली ओळख निर्माण केली. २०१९ मध्ये काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र, संदीप परदेशी आणि हितेंद्र क्षत्रिय यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, योगेश मराठे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.
मराठे यांच्या या निर्णयामुळे तळोदा शहरातील राजकीय समीकरणे किती बदलतात. गेल्या २० वर्षांपासून एकत्र राजकीय वाटचाल करणारे माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी आणि योगेश मराठे यांची त्रिमूर्ती आता वेगवेगळ्या मार्गावर गेली आहे. त्यामुळे, येत्या काळात हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या सोबत महेंद्र पोटे – शहर सरचिटणीस, रा.काँ.(पवार गट), संजय वानखेडे, शहर उपाध्यक्ष, नितीन मराठे – शहर संघटक, संतोष मराठे– तालुका उपाध्यक्ष, (पवार गट), मनोज बारी, हर्षल सुर्यवंशी, योगेश पाटील, नीरज लांबोळे, श्रीकांत बागुल, तुषार जोहरी, यांच्यासह कार्यकर्त्यानी पक्ष प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार गटाला खिंडार पडले आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी मधील हा गट कोणता राजकीय पक्षाचा झेंडा हातात धरतो या बाबत देखील उलट सुलट चर्चा आहेत.
भाजप अंतर्गत गटातील शीतयुद्धात योगेश मराठे हे कोणत्या गटात सक्रिय होतात कोणाला झुकते माप देतात याकडे भाजप मधील प्रस्थापित व नवीन प्रवेश केलेल्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे..

