“अध्यक्षांच्या नावाने कर्जाचे फासे: सोसायटीत खळबळ”
तळोदा : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेत तळोदा शाखेतून 89 शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात, पंढरीनाथ पुंडलिक मराठे, इस्माईल खा बुन्हानखॉ पठाण, आणि जयराज धानका या तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.50 कोटी रुपये अद्याप वसूल करण्यात आलेले नाहीत, आणि हा प्रकार शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून करण्यात आला आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल १.५० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणात सोसायटीचे चेअरमन धनराज आनंदा मराठे यांच्या नावावरही तीन लाख पन्नास हजार रुपयांचे बनावट कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.
कर्ज मंजुरी प्रक्रियेत चेअरमन व सचिव यांच्या सह्या आवश्यक असतात. मात्र, धनराज मराठे यांच्या नकळत त्यांच्या नावाने कर्ज काढण्यात आले, त्यामुळे संस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या गैरव्यवहारामुळे सभासद शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घर बांधणे व लग्नसोहळ्यांसाठीचे नियोजन ठप्प झाले. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे.
तळोदा शाखेतील हा गैरव्यवहार सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणाचे प्रतीक आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करणे आणि पीडित सभासदांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रत्येक जबाबदार व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे..



