जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. तरीही, द्राक्षांना सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तासगाव तालुका द्राक्ष शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करतात. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करत द्राक्ष शेती करावी लागत आहे.
यंदा खरड छाटणीपासूनच पावसाने उसंत घेतली नाही. त्यामुळे अनेक बागांमध्ये पाणी साचून राहिले व वेलींच्या पांढऱ्या मुळ्या बंद झाल्या. परिणामी द्राक्षांच्या ओलांड्यांवर आणि काड्यांवर मुळ्या फुटल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक छाटण्या घ्याव्या लागल्या. त्यामधून अनेक बागांना अपेक्षित प्रमाणात द्राक्ष माल मिळाला नाही. सतत ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष काड्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्यामुळे अनेक बागांमध्ये फळधारणा कमी झाली, आणि काही बागा पूर्णपणे फेल गेल्या. तसेच बागांमध्ये चिखल झाल्याने वेळेत खते देणे आणि ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करणेही कठीण झाले.


