तळोदा शिवसेनेचा उपक्रम शिलाई मशीन वाटप ……
लाडकी बहीण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली असून या योजनेचा अपात्र लाभार्थ्यांना लाभ देऊ नका, मात्र पात्र बहिणींना योजनेपासून वंचित ठेवू नका अशी आमची मागणी आहे. तळोदा शिवसेनेची नियत साफ आहे आणि त्यातूनच आजचा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम होत आहे. यामुळे महिला बहिणींना एक उत्पन्नाचे व त्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार आहे असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

येथील माळी समाज मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारी महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी, नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, नगरसेविका प्रतीक्षा जितेंद्र दुबे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश पराडके, लोकसभा प्रमुख ललित जाट, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, सिनेट सदस्य डॉ. दिनेश खरात, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, शहाद्याचे तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल, सुनीता पाडवी, जितेंद्र जमदाडे, दुर्गा ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की, तळोदा शिवसेनेने बहिणींना शिलाई मशीनचे वाटप करीत दिलेला शब्द पूर्ण केला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र भेटवस्तू सोबतच लाडक्या बहिणींचे संरक्षण करणे देखील तितकेच आवश्यक आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की, तळोदा शिवसेना शिवसेनेचे ब्रिद वाक्य ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे काम करीत असते. येथील पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांसाठी धडपड करीत असतात. आणि त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करीत असतात. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मराठे यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पेंद्र दुबे यांनी आभार मानले.




