भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झालेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. दैवीशक्ती असल्याचं भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. शिवाय कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात ३० साक्षीदार, पीडितांची चौकशी सुरू आहे. या महिलांची कुठेही ओळख पटणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन करत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली.
नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत SIT प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणात एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. एकूण २४ जणांचे पथक या गुन्ह्यांचा तपास करत आहे. खरातवर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मिळून एकूण १२ गुन्हे दाखल झालेत. या १२ पैकी ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे आहे. २ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. एसआयटीकडील गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत तर उर्वरीत ३ गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धाविरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ याप्रमाणे दाखल आहेत. आजपर्यंतच्या तपासात ३० पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केली आहे. साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवत होता आणि यातून पैसा उकळत होता असं त्यांनी सांगितले.


