आतापर्यंतचा बातम्या

ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा – बिरसा फायटर्सची मागणी

ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा – बिरसा फायटर्सची मागणी

पालकमंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात ड्रोन ऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पालकमंत्री नंदुरबार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, कोषाध्यक्ष पप्पू अवाया,शहाणाचे जगदीश डुडवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

ड्रोनद्वारे आरोग्य सेवेची भरारी; दुर्गम भागांना मिळणार जलद उपचार, पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोनचे उद्घाटन,अशी बातमी वाचून आश्चर्य व खेदही वाटला.नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम केलापाणी,पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या आदिवासी भागांत रस्ते आणि रुग्णवाहिका पोहोचत नसल्यामुळे, गरोदर महिलांना बांबू किंवा चादरीच्या झोळीतून (doli) मैल न् मैल पायी चालून किंवा पुराच्या पाण्यातून वाट काढत रुग्णालयात नेण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

ही परिस्थिती आजही कायम आहे.या जीवघेण्या प्रवासात अनेकदा महिलांची वाटेतच प्रसूती होते किंवा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतात. अशा घटना सातत्याने घडत असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा आहे.

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही नंदुरबारमधील सातपुड्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात आजही रस्ते, पाणी, वीज,शाळा, अंगणवाडी ,दवाखाना या सुविधा पोहचल्या नाहीत.

 

 

ग्रामीण व दुर्गम भागात फक्त कागदोपत्री रस्ते पूर्ण दाखवून प्रत्यक्षात रस्ते बनवले नाही.येथील लोकप्रतिनिधी, ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने रस्तेच्या रस्ते गायब करून मोठा भ्रष्टाचार केला आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आजही रस्ते या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत

.परिणामी रूग्णांचे व गर्भवती महिलांचे रस्त्यावरच दूर्दैवी मृत्यू होतो. रस्ते नसणे हा या आदिवासी दुर्गम भागातील मुख्य समस्या आहे. ड्रोन आदिवासी दुर्गम भागात पोहचवण्याऐवजी रस्ते बनवून रूग्णवाहिका पोहचवली तर आदिवासींचे लाखो जीव वाचतील व रस्ता झाल्यावर माणसेही पोहोचतील.म्हणून आम्हाला ड्रोन नको, रस्ते हवेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *