परभणी

निवडणुकीच्या तोंडावर परभणीत ५० गावठी कट्टे; खासदार संजय जाधव यांच्या दाव्याने खळबळ

परभणी : पोलिस प्रशासनाला कुठलेही गांभीर्य या निवडणुकीचे असल्याचे दिसून येत नाही. पोलिस अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्थेसह विविध बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. निवडणुकीच्या तोंडावर शहरात ५० पेक्षा जास्त गावठी कट्टे काही गंभीर बाबी घडविण्यासाठी आणले गेले असल्याचे मी गांभीर्यपूर्वक बोलत आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे घातपाताचे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलावीत. यावर गृहमंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. निवडणुकीत अशा गावठी कट्टे व इतर बाबीमुळे जीविताला धोका निर्माण होऊ नये, म्हणून मी ही बाब मांडत असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

महापालिकेच्या निवडणूक अनुषंगाने विविध ठिकाणी गैरप्रकार तसेच भांडण, तंटे आणि वादाच्या घटना होण्याची शक्यता वाटत असल्याने पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना सुद्धा दिल्या. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाचे आयुक्त यांनी निवडणूकीत लागणाऱ्या विविध प्रकारच्या टेंडरच्या माध्यमातून सावळा गोंधळ चालविला आहे. अत्यंत स्वस्तातील खाद्यपदार्थ कसे काय उपलब्ध केले आणि त्याचे साटलोटे काय हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. दहा पैशात समोसा आणि असेच अन्य खाद्यपदार्थ एवढ्या स्वस्त दरात मिळत असतील तर हा कायदा देशाने लागू करावा. ज्यामुळे भारतातील नागरिक सुजलाम सुफलाम तरी होतील. दहा पैशांमध्ये आज खाद्यपदार्थ कसे काय उपलब्ध होत आहेत याचे पण गौडबंगाल समोर येणे गरजेचे आहे. जालन्याच्या कुणीतरी जवळच्या माणसाला हे टेंडर दिले आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा या बाबी तपासणे आवश्यक आहे. काही प्रभागात आधार कार्डवरचे फोटो बदलून बोगस कार्डचे सुद्धा अनेक ठिकाणी गैरप्रकार होत आहेत. या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिस आणि मनपा असे दोन्ही प्रशासन इतके सुस्त आणि डोळे झाकून कसे कारभार करीत आहे, हाच गंभीर प्रकार असल्याचे खासदार संजय जाधव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *