रॉयल्टी बंद असतानाही तळोद्यात हजारो टन वाळूची छुपी वाहतूक; तलाठ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

वाहने पकडण्यासाठी साईटवर जाण्याचा दावा; काही ठिकाणी तलाठ्यांच्या सहकाऱ्यांकडूनच वाहतूक होत असल्याच्या चर्चेने खळबळ

तळोदा : तालुक्यात वाळूची रॉयल्टी बंद असतानाही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून रात्रीच्या अंधारात तसेच छुप्या पद्धतीने हजारो टन वाळूची वाहतूक सुरू असल्याची चर्चा आहे. महसूल विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना, या संपूर्ण प्रकारात तलाठ्यांची भूमिका केंद्रस्थानी आली आहे.

गावपातळीवर महसूल विभागाचा महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वाळूची वाहने सर्रास फिरत असतानाही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, वाळूची वाहने पकडण्यासाठी साईटवर जात असल्याचे सांगून काही तलाठी कार्यालयात उपलब्ध नसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. जर तलाठी प्रत्यक्ष कारवाईसाठी क्षेत्रात जात असतील, तर पकडलेल्या वाहनांवर किती कारवाया झाल्या? त्यांची नोंद कुठे आहे? आणि रॉयल्टी बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक महसूल विभागाच्या निदर्शनास कशी येत नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही ठिकाणी तलाठ्यांच्या परिचयातील अथवा सहकाऱ्यांमार्फत वाळू वाहतूक होत असल्याच्या चर्चाही आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने या बाबींची निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे.

रॉयल्टी बंद असताना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? कारवाई होत नसेल तर त्यामागचे कारण काय? याचा वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रॉयल्टी बंद असताना सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर महसूल विभाग नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता तळोदावासीयांचे लक्ष लागले आहे….

Loading spinner