दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश
तळोदा : तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात तपासणी आणि कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत तळोदा तहसीलदार दीपक घिवरे यांनी तालुक्यातील सर्व तलाठी आणि अव्वल कारकुनांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर आणि दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कारवाई का प्रस्तावित करू नये, याबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहायक जिल्हाधिकारी तळोदा भाग यांच्याकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी दररोज कार्यालयातील ग्रुपवर जिओ टॅग जीपीएस कॅमेऱ्याद्वारे काढलेली छायाचित्रे पाठवून तपासणीची माहिती महाखनिज ॲपमध्ये भरणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच तपासणी व कारवाई शून्य दिसून आल्यास संबंधित पथकास जबाबदार धरण्याचेही निर्देश होते.
मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी होत नसल्याचे आणि तपासणीचे छायाचित्रे कार्यालयीन ग्रुपवर पाठविली जात नसल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दोन दिवसांत खुलासा अन्यथा कारवाई!
तहसीलदारांनी बजावलेल्या नोटिशीत संबंधितांकडून दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा मागविला आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत सातत्याने तक्रारी होत असताना आता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या नोटिशीनंतर तरी गौण खनिज वाहतुकीच्या तपासणीला गती मिळणार का आणि प्रत्यक्षात किती कारवाया होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

