CM Devendra Fadnavis On CJI Stands: इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज होत असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट मत मांडले आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मी कायमच सांगत आलो आहे की, हे सगळे संविधान विरोधी लोक आहेत. विरोधक संविधानाची भाषा करत आहेत. हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे की देशाचे सरन्यायाधीश आंदोलकांना भेटतात? सर्वोच्च न्यायालय जे म्हणाले ते योग्य आहे तुम्ही कोर्टात या तिथे लढता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ही कुठली पद्धत आहे?
सरन्यायाधीशांनी संवैधानिक अधिकारांच्या आधारेच हे सांगितले आहे की, मी यांना भेटू शकत नाही. त्यानंतर हे लोक सरन्यायाधीशांवर टीका करत आहेत. ही कुठली पद्धत आहे?, अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे नेते कनॉट प्लेस-बारखंभा रोड जंक्शनपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मार्च काढत आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्याचा विरोधकांचा इरादा होता. मात्र, सरन्यायाधीशांनी हा भेटीचा प्रस्ताव नाकारला आहे. असे असले तरीही लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर विरोधीपक्षांचे नेते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पत्राला उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले की, मला त्यांचे पत्र काल रात्रीच मिळाले, मी त्याला कालच उत्तरही दिले आहे. त्यात मी काही कारणे सांगितली आहेत. ज्यांमुळे मी भेट घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहेत. कुणीही याचिका दाखल करू शकतो. आम्ही त्यांना जो त्यांचा अधिकार आहे, तो पूर्ण देऊ.

