नंदुरबार (प्रतिनिधी) : लोकसाहित्य हा समाजाच्या जगण्याचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. आदिवासी समाजातील लोकगीते, मौखिक परंपरा, डोंगरदेवाची पूजा, पर्यावरणविषयक ज्ञान आणि बोलीभाषांचे संवर्धन करून हा वारसा लिखित स्वरूपात जतन करणे काळाची गरज आहे. पुढील पिढ्यांसाठी आपले अस्तित्व आणि अस्मिता टिकवायची असेल, तर लोकसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीजी सार्वजनिक वाचनालय नंदुरबार आणि साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने कन्यादान कार्यालयातील शालिनीताई नटावदकर नगरीत जिल्हा लोकसाहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, मसापचे विभागीय कार्यवाह संजीव गिरासे स्वागताध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, प्रमुख अतिथी म.सा.प,चे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, साहित्य़ भारतीचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी,श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले की, जनजाती समाजाचा सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. निसर्गाशी जोडलेल्या अनेक परंपरा आजही मौखिक स्वरूपात आहेत. मात्र, त्या लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत. डोंगरपूजा आणि पर्यावरणाशी संबंधित पारंपरिक ज्ञानाचा ठेवा दस्तऐवजीकरण करून जतन केला पाहिजे. आदिवासी समाजातील क्रांतिकारक आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना पुढे आणता येईल का, यावरही साहित्यिकांनी चिंतन करावे.
प्रदीप निफाडकर म्हणाले की, नंदुरबारमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे. महिन्यातून एकदा साहित्यिकांच्या गप्पा, कविता आणि चर्चेसाठी बैठका आयोजित कराव्यात. साहित्याच्या क्षेत्राला आपणही काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. नंदुरबारमध्ये साहित्य चळवळ रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसाहित्याच्या व्यापक स्वरूपावर सखोल विवेचन केले. त्या म्हणाल्या की, लोकसाहित्यातील ‘लोक’ हा शब्द अत्यंत व्यापक आहे. समाजातील प्रत्येक घटक, त्याचे जगणे, अनुभव, परंपरा आणि ज्ञान यांचा समावेश लोकसाहित्यात होतो. मौखिक परंपरा ही लोकसाहित्याची महत्त्वाची शक्ती आहे. लोकविज्ञान, लोकज्योतिष आणि लोकजीवनातील विविध पैलूंचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
इतिहासलेखनात लोकसाहित्याचा आधार घेतला पाहिजे. वि. का. राजवाडे यांच्यासह बोटावर मोजण्याइतक्याच साहित्यिकांनी लोकसाहित्याचा आधार घेऊन इतिहासलेखन केले. मात्र, आजही इतिहास आणि विविध शास्त्रांच्या अभ्यासात लोकसाहित्याचा पुरेसा विचार होताना दिसत नाही. लोकसाहित्याचे संकलन, नोंदी आणि चिकित्सक अभ्यास केल्यास जागतिक स्तरावरही अनेक साम्यस्थळे समोर येऊ शकतात. लोकसाहित्य म्हणजे केवळ वर्गीकरण नव्हे, तर स्थळ आणि काळाच्या संदर्भात त्याची चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे. ललित साहित्याला लोकसाहित्याचा मोठा आधार मिळतो.
नजूबाई गावित यांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, त्या जगातील पहिल्या आदिवासी महिला कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या आत्मचरित्रातील अनुभवांमधून आदिवासी जीवन, निसर्ग आणि सांस्कृतिक वास्तवाचे दर्शन घडते. भाषेच्या संवर्धनावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, एक भाषा संपणे म्हणजे एक संस्कृती संपणे होय.स्वागताध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे स्वागत केले..संमेलनाचे प्रास्ताविक साहित्य़ भारतीचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी यांनी केले.
अभिजित खेडकर यांनी पाव्हूण्यांचा परिचय करुन देत सुत्रसंचालन केले.श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी यांनी आभार मानले.
दिपक कुळकर्णी,, सुलभा महिरे,कल्याणी डांगे,तारकेश्वर पटेल,अजित लांडगे,संतोष पाटील,गौरीशंकर धुमाळ,सविता पटेल,डॉ पुष्कर शास्त्री,राहूल खेडकर,पंकज पाठक,विजय पवार श्रीराम दाऊतखाने,सुनिल भदाणे,निंबाजीराव बागूल,क्षमा वासे वसईकर,प्रा डॉ माधव कदम,डॉ गिरीश पवार,प्रशांत पवार,डॉ विवेक वैद्य व रणजित राजपूत आदींनी परिश्रम घेतले.
नंदुरबार(प्रतिनिधी) जिल्हा लोक साहित्य़ संमेलनात पार पडलेल्या परिसंवादात विविध मान्यवरांनी अभ्यासपुर्ण विवेचन केले. बोलीभाषा निर्मिती संवर्धन यांसह विविध विषयांवर परिसंवाद गाजले.
प्रा डॉ माधव कदम यांनी अहिराणीच्या साहित्याचा अभ्यासपुर्ण विवेचन केले. बोली भाषा जगली तरच माणूस जगेल, अहिराणी माय आहे तर मराठी मावशी. युटयूबमुळे कानुबाईची गीते पाहता येतात.,हे एकप्रकारे योगदान आहे.लोकसाहित्य़ जीवंत ठेवण्यासाठी नवनविन तंत्रज्ञान अवलंबले पाहिजे.
प्रा सविता पटेल म्हणाल्या,खानदेशात गुर्जर समाज मोठया संख्येत राहतो.गुजरी बोलीभाषेतून लोकसाहित्य़ निर्माण व्हावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त़ केली.
प्रा टी एन पाडवी यांनी आदिवासींच्या विविध भाषेवर प्रकाशझ्योत टाकला.पायाभुत विविध आदिवासी भाषीक परंपरा लोक गीते पारंपारिक ज्ञानाचा साठा आहे. योग्य़ संकलन करणे गरजेचे आहे. भिली,कोकणी,मावची भाषेचे संकलन ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करुन केला जात आहे.ए आयच्या माध्यमातून संरक्षण मिळाले आहे, हा त्यामागचा उद़देश आहे. त्या प्रयत्नांना यश मिळो.लोकसाहित्य़ निर्माण होवो. माझी बोली, माझा अभिमान,याचा संकल्प़ करूया.बोली जपणे म्हणजे माती जपणे,,असे त्यांनी सांगितले.
निंबाजीराव बागूल अध्यक्षस्थानावरुन बोलतांना म्हणाले, ऐहिराणी भाषा नष्ट़ व्हायला नको.ऐहिराणी भाषेतल्या कवीतामध्ये यमक नसले तरी गोडवा असतो.ऐहिरानी भाषेची ताकद आहे.डबूक वडया,पिठ घाली मिरच्या,पोट झाकण याचा इंग्रजी भाषेत अनुवाद होणार नाही.ऐहिराणी गोड असली तरी सोपी नाही.,असे त्यांनी सांगितले.
परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रांमध्ये लळीतवर मुरलीधर पाटील यांनी परंपरेला स्पर्श़ केला.अविनाश कोकणी यांनी डोंग-यादेवावर व्याख्यान देत नृत्य़ही केले.श्रावण चव्हाण व करणसिंग चव्हाण यांनी वंजारी समाजाची एक वेषभुषा,एक भाषा यावर सविस्त़र विवेचन केले.विजय पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.क्षमा वासे वसईकर यांनी सुत्रसंचालन केले.होळतर्फे अनुसुचित जाती नवबौध्द़ शाळेच्या विद्यार्थीनीनी अंत्यंत सुंदर नृत्य़ केले.

