तळोदा नगरपालिकेसाठी निधी आणण्यासाठी त्यांची व योगेश चौधरी यांची सतत धडपड सुरू असते. त्यांनी तळोद्याचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. ते कुठल्याही दबावाला बळी न पडता काम करीत आहेत. जनतेचा सेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या भाग्यश्री चौधरी यांच्यासारख्या नगराध्यक्षा लाभल्या हे तळोद्याचे भाग्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केले.
शहरातील विविध विकासकामांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (सर्वसाधारण) योजनेंतर्गत तब्बल सात कोटी ७४ लाख १८ हजार ८२७ रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्या कामांचे भूमिपूजन रविवारी (ता. २२) रात्री करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, भाजपचे महामंत्री कैलास चौधरी, माजी नगराध्यक्ष जगदीश चौधरी, नवापूरचे उपनगराध्यक्ष श्री. नगराळे, पाणीपुरवठा सभापती कल्पेश चौधरी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी, नगरसेवक इमरान खाटिक, नगरसेविका गायत्री पिंपरे, हर्षा पाडवी, नगरसेवक अरविंद प्रधान, स्वीकृत नगरसेवक गिरधर सागर, बंटी कोळी, धनराज पाडवी, माजी नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक वतन अग्रवाल, फारूख शहा, नाना निकम, मनोहर गावित, रईसअली अब्बासअली आदी उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी सांगितले की, मागच्या वर्षी निवडणुकीच्यावेळी प्रचार करतांना नागरिकांचा अनेक समस्या लक्षात आल्या. त्या समस्या दूर करण्यासाठी निधीची आवश्यकता होती, ती आता काही प्रमाणात दूर झाली आहे. भविष्यात देखील निधी उपलब्ध करून विकास कामे पूर्ण करण्यात येतील. याप्रसंगी मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थित हरिओम नगर, मीरा कॉलनी तसेच जोशी नगर मध्ये प्रस्तावित विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गटारी, रस्ते ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित कामे होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी हेमंत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास राजपूत, अमन जोहरी, मन्नू पाडवी आणि परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

