पुणे : एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हणजे ‘युद्धात जिंकलो आणि तहात हरलो’ अशी परिस्थिती झाली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल केली नसून त्यांच्या भावनांशी क्रूर चेष्टा केली आहे. मूळ मागण्या बाजूलाच राहिल्या असून, या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या हाती प्रत्यक्ष काहीही लागलेले नाही. असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकार आणि प्रशासनावर टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा ही होती. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पेपरफुटीची प्रकरणे आणि आयोगाने घातलेले घोळ याला जबाबदार कोण? झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण स्वीकारणार? विवेक भिमनवार यांना जर सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले असते, तर तसे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले असते. परंतु, भिमनवार यांनी स्वतः ट्विट करून रजेवर जात असल्याचे सांगितले. याचा अर्थ ते केवळ ‘हवापालट’ करण्यासाठी स्वतःहून बाजूला झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

विद्यार्थ्यांवर सूडबुद्धीने कारवाई होण्याची भीती

आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतल्याचा दावा खोटा ठरवत, “जर गुन्हे मागे घेतले असतील तर विद्यार्थी राहत असलेल्या खोल्यांच्या मालकांना नोटिसा का पाठवल्या जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, आंदोलनात समोर आलेल्या हुशार विद्यार्थ्यांवर उद्या सरकारी सेवेत रुजू होताना सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही कशावरून? अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हे विद्यार्थी सरकारच्या गोपनीय अहवालात नोंदवले जातील, अशी शक्यता वर्तवत विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ म्हटल्याचे शब्दही अजून मागे घेतले नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. पदवीधर निवडणुकीत फटका बसू नये म्हणूनच सरकारने ही तात्पुरती सारवासारव केली आहे. आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाला वेळ देऊन मोठे योगदान दिले, मात्र शेवटी विद्यार्थ्यांच्या हाती काहीही पडले नाही, हेच वास्तव असल्याचे त्या म्हणाल्या.

आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे स्वागत

मुंबईतील आंदोलनादरम्यान आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे एकत्र दिसल्याच्या घटनेवर अंधारे यांनी समाधान व्यक्त केले. “शिवसेना जेव्हा रस्त्यावर असते, तेव्हा आमचे नेतेही रस्त्यावर असतात. आंदोलनामुळे गुन्हे दाखल झाले म्हणून काय फरक पडतो? वाया गेलेली केस असण्यापेक्षा जनहितासाठी अंगावर केस पडणे महत्त्वाचे असते,” असे सांगत हा क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही तीव्र आक्षेप नोंदवला. देशभरात उद्रेक सुरू असताना त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकारावर उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

Loading spinner