दीर-भावजयीच्या प्रेमात अडसर; पुतण्याचा चुलत्याने काढला काटा, तीन दिवसांनी मृतदेह सापडला
खून करून चुलता गावात जाऊन काहीच घडले नाही अशा आविर्भावात वागला

तामलवाडी (जि. धाराशिव) : दीर – भावजयीच्या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलावानजीक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेऊन मंगळवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारात कदम यांची शेती आहे. ती शेती दत्ता कोरे ही व्यक्ती बटाईने करतात. त्यांनी उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार देविदास कांबळे यांना शेतात सालगडी म्हणून ठेवले होते. ओमकार हा भावजयीला घेऊन शेतात राहात होता. तिचा मुलगा कृष्णा कांबळे (१३) हा कधी गावी वडिलांकडे, तर कधी आईकडे राहायचा. दरम्यान, कृष्णा हा आरोपी चुलता ओमकार व आईतील प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना देत असल्याच्या संशयावरून १ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता आरोपीने कृष्णाला तलावातील विद्युत पंपास पाइप बसवण्याच्या बहाण्याने तलावाकडे नेले. याठिकाणी कुऱ्हाडीने घाव घालून त्याने कृष्णाचा खून केला. मृतदेह लगतच्या उंच वाढलेल्या गवतात टाकून तो पसार झाला. ५ जानेवारी रोजी सायंकाळी तामलवाडी येथील धनाजी नेटके हा गुरे चारत असताना त्यास मृतदेह आढळून आला. यानंतर तामलवाडी ठाण्याचे सहायक निरीक्षक गोकूळ ठाकूर यांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपी ओमकार कांबळे यास मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
खून करून गाव गाठले
कृष्णा कांबळे या पुतण्याचा खून केल्यानंतर आरोपी चुलता ओमकार कांबळे याने गाव गाठले. यानंतर सपोनि. गोकुळ ठाकूर यांनी पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर अधीक्षक शफकत आमना, उपाधीक्षक नीलेश देशमुख यांच्या सूचनेनुसार तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व कर्मचारी जुबेर काझी, दिनकर ताेगे, सुरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, तुराब शेख, हणमंत कोरे, नितीन भोसले यांच्या साथीने कोळसूर हे आरोपीचे गाव गाठून तेथून त्यास ताब्यात घेतले.
तीन दिवसानंतर प्रेत नातवाइकांकडे
मयत कृष्णा कांबळे याचे शवविच्छेदन तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मात्र, प्रेताची ओळख पटली नसल्याने प्रेत शवागारात ठेवण्यात आले होते. खुनाचा उलगडा झाल्यानंतर बुधवारी प्रेत ताब्यात घेण्यासाठी नातेवाइक रुग्णालयात दाखल झाले. तीन दिवसानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात दिले.