आतापर्यंतचा बातम्या

मंगलाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली फुललेला भाईसाहेबांचा ज्ञानयज्ञ

शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारांची अखंड ज्योत उजळवत समाजप्रबोधनाची यशस्वी वाटचाल

तळोदा व सातपुडा परिसरातील आदिवासी, ग्रामीण आणि वंचित घटकांच्या शिक्षणविश्वात अध्यापक शिक्षण मंडळ हे नाव केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर विश्वास, आत्मीयता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेताना, त्याच वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्य सैनिक, प्राचार्य कैलासवासी भाईसाहेब गोरखनाथ हुलाजी महाजन यांच्या विचारधारेचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते.

मंगलाताई महाजन या केवळ प्रशासक नाहीत, तर शिक्षणाला मातृत्वाची ऊब देणाऱ्या संवेदनशील अध्यक्षा आहेत. ‘मंगलाताई महाजन शतायुषी होवोत’ हा समाजातील प्रत्येक घटकाकडून उमटणारा सूर त्यांच्या कार्याची पोच आणि प्रभाव अधोरेखित करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली अध्यापक शिक्षण मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे.

मंगलाताई महाजन यांचे व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्य, देशप्रेम आणि लोकशाही मूल्यांच्या संस्कारातून घडलेले आहे. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक मारुतराव बोराटे यांच्याकडून राष्ट्रप्रेमाचे, स्वातंत्र्याचे आणि लोकशाही मूल्यांचे संस्कार बालपणापासूनच त्यांना लाभले. पुढे विवाहानंतर ज्या घरात त्या सून म्हणून गेल्या, ते घराणेही स्वातंत्र्यसैनिकांचेच होते. अध्यापक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक व शिक्षणमहर्षी गोरखनाथ हुलाजी महाजन—सर्वांचे लाडके ‘भाईसाहेब’—यांच्या सहवासात राहून त्यांनी समाजकार्य, शिक्षणप्रसार आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

सातपुड्यातील ‘ज्ञानगंगेचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाणारे भाईसाहेब महाजन हे दूरदृष्टीचे नेतृत्व होते. ज्या काळात आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय नव्हती, उच्च शिक्षणासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत होती आणि परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते, त्या काळात ५ सप्टेंबर १९६५ रोजी त्यांनी अध्यापक शिक्षण मंडळाची स्थापना केली. “कसेल त्याची जमीन, पिकवेल त्याचा मळा आणि शिकवेल त्याची शाळा” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला हा प्रयोग आजही महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रातील एक अभिनव आणि आदर्श मॉडेल मानला जातो.

अध्यापक शिक्षण मंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रातील अशी एकमेव संस्था आहे की जिथे अध्यक्षांपासून कार्यकारी मंडळापर्यंत सर्व पदांवर संस्थेतीलच शिक्षक पदाधिकारी असतात. त्यामुळे शिक्षकांवर कोणताही बाह्य दबाव न राहता स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि लोकशाही मूल्यांवर आधारित कार्यपद्धती विकसित झाली. भाईसाहेबांनी उभ्या केलेल्या या लोकशाही शिक्षणसंस्कृतीचा वारसा मंगलाताई महाजन यांनी समर्थपणे पुढे नेला.

१० जुन २००१ रोजी भाईसाहेब महाजन यांचे निधन झाल्यानंतर संस्थेची सर्वस्वी जबाबदारी मंगलाताई महाजन यांच्यावर आली. त्या कठीण काळात त्यांनी खंबीरपणे उभे राहत संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. भाईसाहेबांनी रोपट्यासारखी लावलेली संस्था त्यांच्या दूरदृष्टीतून आज वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. या परिवर्तनामागे मंगलाताई महाजन यांचे संयमी नेतृत्व, शिस्तबद्ध प्रशासन आणि मानवी संवेदना यांचा मोठा वाटा आहे.

आज तळोदा, अंबाबारी, काथर्दे, वर्षी, सांगवी, पनाखेड अशा आदिवासी व ग्रामीण भागांत अध्यापक शिक्षण मंडळाच्या विविध स्तरांवरील शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या सहा गावांमध्ये नर्सरीपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असून हजारो विद्यार्थी—श्रीमंतांपासून गोरगरीब कुटुंबांतील— शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आशेचा किरण ठरली आहे.

या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले असंख्य माजी विद्यार्थी आज विविध शासकीय सेवांमध्ये, तसेच खासगी,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उन्नती साधण्याचे भाईसाहेबांचे स्वप्न मंगलाताई महाजन यांच्या काळात प्रत्यक्षात साकार होत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. संस्थेमुळे जवळपास १५० कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना रोजगाराचे आणि स्थैर्याचे सुरक्षित वातावरण मिळाले आहे.

संस्थेच्या पाच ठिकाणी आज भव्य, प्रशस्त आणि टोलेजंग इमारती उभ्या असून त्या परिसरातील शैक्षणिक वैभवाची साक्ष देतात. या इमारतींमागे मंगलाताई महाजन यांचे काटेकोर नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख धोरण आहे. उर्वरित एका ठिकाणीही लवकरच भव्य इमारत उभारली जाणार असून संस्थेच्या भौतिक विकासाला आणखी गती मिळणार आहे. सध्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यांपर्यंत संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.

मंगलाताई महाजन यांनी संस्थेच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हाने ओळखून शिक्षक अद्ययावत राहावेत, यासाठी संस्थेमार्फत नियमित शैक्षणिक उद्बोधन शिबिरे, प्रशिक्षण कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी स्वतः अध्यक्षा करतात.

त्या प्रत्येक शाळेला भेट देऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि आपुलकीने मार्गदर्शन करतात. त्यांच्या वागणुकीतून ‘संस्था म्हणजे कुटुंब’ ही भावना ठळकपणे दिसून येते. कुटुंबप्रमुखासारखी शिस्त आणि आईसारखी माया—या दोन्हींचा समतोल साधत त्या संस्थेचे नेतृत्व करतात. त्यामुळे अध्यापक शिक्षण मंडळ हे केवळ शैक्षणिक संस्थान न राहता एकसंघ कुटुंब म्हणून ओळखले जाते.

मंगलाताई महाजन यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांचे पती व भाईसाहेबांचे पुत्र, संस्थेचे आधारस्तंभ अरुणकुमार गोरखनाथ महाजन यांचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर मंगलाताईंनी संस्थेची प्रगती अधिक दृढपणे साधली. शिक्षणप्रसाराचा नंदादीप असलेल्या भाईसाहेब महाजन यांनी पेटवलेली ज्ञानज्योत आज मंगलाताई महाजन व संचालक मंडळ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहेत.

करुणा, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या भाईसाहेबांचे विचार व कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यमान अध्यक्षा मंगलाताई महाजन व सर्व संचालक मंडळ करत आहेत. संस्थेने सुवर्णमहोत्सव यशस्वीपणे पूर्ण केला असून आता अमृतमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. योग्य निर्णय, सक्षम प्रशासन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वामुळे ही यशस्वी घोडदौड सुरूच आहे.

समाजप्रबोधनाच्या जनकाने स्थापन केलेल्या अध्यापक शिक्षण मंडळाला विकासाच्या शिखरावर नेण्याचे कार्य मंगलाताई महाजन व संचालक मंडळ समर्थपणे करत आहेत. भाईसाहेबांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार मंगलाताई महाजन, संचालक मंडळ व संपूर्ण महाजन परिवार प्रामाणिकपणे जपत असून त्यात त्यांना भरीव यश मिळाले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि शिक्षणसेवेतील हीच उज्ज्वल वाटचाल लाभो, हीच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक सदिच्छा.

संकलन-डी पी महाले
प्रशांत मोहन सूर्यवंशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button